एस.टी.ची मालवाहतूक महागली; किलोमीटरमागे ३ रुपयांची वाढ
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनामुळे आर्थिक तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाने उत्पन्नाचा स्रोत म्हणून मालवाहतूक सुरू केली. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे हे दर प्रतिकिलोमीटर 3 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. सोमवार, दि. 20 जुलैपासून दरवाढ लागू होत आहे. नवे दर प्रतिकि.मी. 38 रुपये असतील.
प्रवासी गाड्यांमध्ये काहीसा बदल करून मालवाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे उत्पन्नात काहीशी भर पडली. महामंडळाला इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमकडून इंधन पुरवठा होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर 15 दिवसांनी बदलले जातात. 1 जुलैच्या इंधन दरात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. त्यामुळे इंधन खर्चात वाढ झाली. महामंडळाला दिवसाला 1 लाख लिटर डिझेल लागते. डिझेल खरेदीसाठी महामंडळ वर्षाला 3 हजार कोटींची तरतूद करते. त्यापैकी 2 हजार 800 कोटी रुपये डिझेलवर खर्च होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 20 जुलैपूर्वी बुकिंग झालेल्या मालवाहतुकीसाठी सुधारित भाडे लागू राहणार नाही.
Post a Comment