'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कटू निर्णय घ्‍यावे लागतील'


माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच चालली आहे. त्यामुळे ही वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालेल, परंतु ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिक सतर्क व्हावे लागेल असे सक्त आदेश महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रशासनाला दिले.

संगमनेर तालुक्यात कोरोनाबधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शांम्प्रोच्या प्रांगणामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये थोरात बोलत होते. यावेळी आ. डॉ सुधीर तांबे प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.  

यावेळी थोरात म्हणाले की, कोरोना हे  मानवजातीवर आलेले फार मोठे संकट आहे. गेल्‍या चार महिन्यांपासून प्रशासनातील सरकारी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, खासगी डॉक्टर, पोलिस प्रशासन, महसूल अधिकारी कर्मचारी, आशा सेविका यांचे योगदान मोठे राहिले आहे. आता ही लढाई  समाजाला सोबत घेऊन लढावी लागणार आहे. प्रशासन आणि सरकारी यंत्रणा आप आपली जबाबदारी चोखपणे निभावत आहेत. यापुढेही अशाच प्रकारचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.



राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात समारंभ होत आहेत. यामध्ये लग्नसमारंभ, वाढदिवसाच्या पार्ट्या, बाहेरील शहरातून येणारे पाहुणे तसेच बाहेर जाऊन पुन्हा शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांमुळेच खऱ्या अर्थाने कोरोनाबधित रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यासाठी  येत्या काळात स्वयंसेवी संस्था, होमगार्ड, एनसीसी,  एन. एस. एस यांची मदत घेऊन विनाकारण गर्दी होणाऱ्या ठिकाणावर नियंत्रण आणावे लागेल. त्यासाठी प्रशासनाला वेळेप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी घ्या अशा सक्त सूचना देत, कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत कमी करा अशा सूचना थोरात यांनी दिली आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात सध्य स्थितीला  349 कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झाली असून, त्यातील 216 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 349 पैकी  14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 119 रुग्णांवर  कोरोना केअर सेंटर  मौलाना आझाद मंगल कार्यालय तसेच कुरणच्या मदरशामध्ये तसेच संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तरी सुद्धा राज्याच्या तुलनेत संगमनेरचा रिकव्हरी रेट 62 टक्के  झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. सध्या संगमनेर मध्ये 119 एक्टिव्ह रुग्ण असून, त्यातील 113 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत, तर दोन रुग्णांना प्राथमिक लक्षणे दिसत आहेत. आता आतापर्यंत संगमनेर मधून 2440 लोकांचे स्‍वॅब घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. तसेच घुलेवाडी येथे कोव्हिड रुग्णालयाची क्षमता वाढून ती  90 बेडची करण्यात आली आहे.  तसेच शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालय व नगरपालिकेचे कॉटेज हॉस्पिटलमध्येही कोव्हिडं  सेंटर सुरू करण्यात आले आहे.  कुरण येथे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने  कुरण येथील मदरशात कोव्हिडं सेंटर सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात कोहिनूर सेंटर अशी क्षमता 500 बेडची केली आहे.

प्रशासन आपले काम करत आहे याला नागरिकांची साथ मिळणे आवश्‍यक आहे. मात्र  प्रशासनाने घालून दिलेले नियम जर नागरिकांनी पाळले नाहीत, तर नाईलाजास्‍तव लॉकडाऊन करावा लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले.

स्वयंशिस्त पाळली नाही, तर लॉकडाऊन : थोरात

संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा चिंतेचा विषय असला तरी लॉकडाऊन करून ही साखळी तुटेल असे वाटत नाही. मात्र  संगमनेरच्या नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत स्वयंशिस्त पाळावी. अन्यथा संगमनेरात लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागेल असे परखड मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post