अंतिम वर्ष परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम



माय अहमदनगर वेब टीम
कोल्हापूर - अंतिम  वर्षतील शेवटच्या सत्राच्या परीक्षा न घेण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाचे पत्र येत्या दोन दिवसांत विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावरून अंतिम वर्ष शेवटच्या सत्राच्या परीक्षा घेणार नसल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.  एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात कुलगुरूंच्या समितीच्या अहवालातील शिफारशींवर दोन दिवसांत निर्णय होईल आणि त्यांचाही प्रश्‍न सुटेल, असेही सामंत म्हणाले.

केंद्र सरकार व ‘यूजीसी’ने अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा प्रश्‍न आहे. महाविकास आघाडी सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोरोनानंतर गुण व ग्रेडमध्ये सुधारणा करायची त्या विद्यार्थ्यांची सरकार परीक्षा घेणार आहे. या निर्णयापूर्वी कुलगुरूंसमवेत चर्चा करून व त्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकार काम करीत आहे. 13 कुलगुरूंनी परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस राज्य सरकारला केली आहे. याबाबत अहवाल दोन दिवसांत स्वीकारणार असल्याचे सामंत म्हणाले.

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असा दोनवेळा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्यायच्या नाहीत, असा ‘यूजीसी’ व केंद्र सरकारचा कोणी गैरसमज करून देत असेल, तर हे धादांत खोटे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, आयआयटीसह पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्‍ली राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत. ‘यूजीसी’ने समजून घेऊन विद्यापीठांकडून परिस्थितीचा आढावा घ्यावा. परीक्षांबाबतच्या निर्णयास राजकीय रंग देऊ नये, विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.



पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाबाबत अनिश्‍चितता आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याअगोदरच याचे निकाल तयार झाले आहेत. एटीकेटीबाबत कुलगुरूंनी केलेल्या शिफारशींसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यानुसार 24 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सुटणार आहे. 7 लाख 40 अव्यावसायिक अभ्यासक्रम व 2 लाख 40 हजार व्यावसायिक अभ्यासक्रम असे मिळून आठ लाख विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार घेण्याची कार्यवाही विद्यापीठांनी करावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.ग्रंथालय अनुदान, कर्मचार्‍यांची पगारवाढ याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आठ दिवसांत बैठक घेतली जाईल, असेही सामंत म्हणाले.

शिवाजी विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांतील वसतिगृह क्‍वारंटाईन सेंटर आहेत. हजारो नागरिकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती अचानक बदलणार नाही. ‘यूजीसी’च्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायची आहे, मग कोरोना विमानातून जाणार आहे का? परीक्षेसाठी रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी कसे येऊन परीक्षा देणार, याचे मार्गदर्शन ‘यूजीसी’ने करावे, असे मंत्री सामंत म्हणाले.

विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नका
राज्य सरकारने अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केलेला नाही. कोरोनाचे पदवीधारक म्हणून बाहेर पडतील, असे म्हणून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नका, अशी टीका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षावर केली.

प्राध्यापक भरतीस स्थगिती  नाही
राज्यातील प्राध्यापक भरतीस स्थगिती दिलेली नाही. वित्त विभागाच्या आदेशाने स्थगिती आली आहे. छोट्या प्रवर्गाचा प्रश्‍न निकाली काढला आहे. कोरोनामुळे प्रक्रिया थांबली होती. प्राचार्य भरतीबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास पाठविला असून, सकारात्मक प्रतिसाद असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post