माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोनाची साखळी तोडण्यासाठी 'चेस दी वायरस' अशा पद्धतीने आता आरोग्य यंत्रणा काम करणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यभरात सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्या तीन महिन्यात बाधितांची संख्या आटोक्यात होती. मात्र, लॉकडाऊन शिथीलतेनंतर बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्या नागरिकांचा ओघ वाढला आणि त्यातून संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला.
आता हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जलद गतीने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी अॅंटीजेन चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळांमधूनही करोना तपासणी करण्यात येत आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून येणार्या परंतू लक्षणे न जाणवणार्या रुग्णांना अशा प्रयोगशाळा अथवा खासगी रुग्णालये जिल्हा रुग्णालयात पाठवित आहेत. वास्तविक अशा रुग्णांसाठी प्रत्येक तालुक्यात तसेच महापालिका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, अशा करोना बाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा,’ असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
दरम्यान, नगर शहर व जिल्ह्यात करोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, अहोरात्र राबत आहे. मात्र करोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याची गरज आहे. दुसरा पर्याय नाही,' अशी मागणी करणारे पत्र खासदार डॉ.सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना लिहिले आहे.
Post a Comment