धारावी करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर; २४ तासांतील 'हे' आकडे सुखावणारे



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी लवकरच करोनाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री हाती आलेल्या आकडेवारीनुसार धारावीत आता फक्त ८६ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली

मुंबईत धारावीमध्ये सर्वात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळेच धारावी झोपडपट्टीत करोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि सरकार हादरलं होतं. धारावीत वेगाने करोना संसर्ग पसरत असताना येथे संसर्गाची साखळी कशी तोडायची, असा गहन प्रश्न आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला पडला होता. मात्र धारावीकरांनी दाखवलेली अभूतपूर्व अशी स्वयंशिस्त आणि पालिका व सामाजिक संस्थांनी अहोरात्र केलेली मेहनत याच्या जोरावर धारावीने करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. धारावीच्या या यशाची थेट जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. करोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या देशांसोबतच जागतिक आरोग्य संघटनेने धारावीचं कौतुक केलं. या आनंदाच्या बातमीनंतर धारावीतील लढ्याला अधिकच बळ मिळाल्याचं गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसू लागलं आहे.

मुंबई पालिका आरोग्य विभागाने दिलेला आकडेवारीनुसार, मंगळवारी धारावीत करोनाचे फक्त ११ नवे रुग्ण आढळून आले. त्यासोबतच धारावीतील एकूण रुग्णसंख्या २ हजार ३९२ इतकी झाली आहे. हे आकडे पाहून घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. कारण यातील केवळ ८६ इतकेच अॅक्टिव्ह रुग्ण आहे. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बाकी रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात धारावीत करोना संसर्गाने एकही रुग्ण दगावलेला नाही. धारावीत करोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी आढळला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post