आठ दिवसांत पीक कर्ज वाटप करा : कृषीमंत्री भुसे



माय अहमदनगर वेब टीम
मालेगाव -शासनातर्फे जिल्हा बँकेस कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८७० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदरची रक्कम खरीप पिक कर्ज वितरणासाठीच बँकेने वापरायची असल्याचे स्पष्ट निर्देश देत कृषिमंत्री दादा भुसे यांनी येत्या ८ दिवसात बँकेने पिककर्ज वाटपाची प्रक्रिया पुर्ण करावी, अशी सक्त सुचना यावेळी बोलतांना केली.

येथील तहसिल कार्यालयात पिककर्ज वाटप करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना ना. भुसे यांनी खरीप पिक कर्जाचे वितरण विनाविलंब होण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी जिल्हा बँकेचे अधिकारी, सहकारी संस्था उपनिबंधक, गटसचिव, सोसायटी पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

याबैठकीत ना. भुसे यांनी पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. तालुक्यातील कर्जमुक्ती योजनेतील १३८५८ पात्र शेतकरी खातेदारांना ११६.४४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सदरची रक्कम प्रथमत: कर्जमुक्ती पात्र खातेदारांनाच पिककर्ज वितरण करण्यात येऊन पिक कर्जाच्या रक्कमेचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८७० कोटी रूपये शासनाने शेतकर्‍यांसाठी दिले आहेत. त्यामुळे कर्जवाटप देखील विनाविलंब झाले पाहिजे याकडे त्यांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

यावेळी सोसायटी पदाधिकार्‍यांनी संस्थापातळीवरील अडचणी मांडल्या. त्यात जिल्हा बँकेकडुन रोख स्वरुपात रक्कम उपलब्ध करुन द्यावी व बँकेची समोपचार योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. पिककर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच गटसचिवांच्या अडचणी व वेतनाच्या संदर्भातील समस्या विश्वनाथ निकम निदर्शनास आणुन दिल्या.

बैठकीस कृउबा उपसभापती सुनिल देवरे, तालुकाप्रमुख संजय दुसाने, उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, विकास अधिकारी डंबाळे, माजी जि.प. सदस्य सुरेश पवार, सहकार अधिकारी बी.बी.आहिरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार नाना आहिरे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post