नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो नागरिक, विद्यार्थी ध्वजारोहण आणि लष्कराचे संचलन पाहण्यास येतात. मात्र, यंदा करोनामुळे स्वातंत्र्य दिन दरवर्षीसारखा साजरा होणार नाही. यावर्षी नागरिकांना कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत साजरा केला जाणार आहे. करोनापासून सुरक्षेची काळजी घेत बैठक व्यवस्था असणार आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे भाषण होते. त्यासाठी दीड हजार करोना योद्ध्यांना निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाला डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि सफाई कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. करोना विरोधातील लढाई सुरू झाल्यापासून करोना योद्धे रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाणार नाही. एनसीसीचे फक्त 400 कॅडेट समारोहाला बोलविण्यात येणार आहेत. पंतप्रधान ज्या स्टेजवरून भाषण करतात, त्याच्या बाजूने दरवर्षी 800 जण बसलेले असतात. यावर्षी तेथील नागरिकांची संख्याही कमी होणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये किमान 5 फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. अनेक अतिमहत्त्वाचे अतिथी स्टेजवर न बसता खालच्या खुर्च्यांवर बसणार आहेत.
स्वातंत्र्यदिन समारोहाची तयारी लाल किल्ल्यावर सुरू करण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून एनएसजी कमांडोही तैनात असणार आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून सुरक्षा यंत्रणा प्रत्येक बाबीचा बारकाईने विचार करत आहेत.
Post a Comment