कोरोना काळात जॅकी श्रॉफ यांचा मदतीचा हात
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील गरजू कलाकार व तंत्रज्ञ यांना मदत करण्याच्या उद्देशाने चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी देखील जीवनावश्यक वस्तूंचे किट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी सहकार्यवाह चैत्राली डोंगरे यांच्याकडे सुपूर्द करत तंत्रज्ञांना मदतीचा हात दिला आहे.
‘सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना याचा त्रास झाला असला तरी यातील पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला याचा विशेष फटका बसला आहे. त्यांना माझ्याकडून जास्तीजास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे’ अशा भावना जॅकी श्रॉफ यांनी बोलून दाखविल्या.
जॅकी श्रॉफ यांनी केलेल्या या मदतीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Post a Comment