उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया
माय अहमदनगर वेब टीम
जयपूर - राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका ओळीचं ट्विट करत सचिन पायलट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र, त्याचा पराभव करता येत नाही. असे पायलट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंडाचा झेंडा हाती घेऊन उभा असणारे सचिन पायलट यांना अखेर काँग्रेसने पदावरून हटवले आहे. या निर्णयापूर्वी जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये १०२ आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची एकमताने मागणी केली होती.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून तसेच राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अध्यक्षपदी मंत्री गोविंद सिंह डोटसारा यांची निवड करण्यात आली आहे.
पायलट यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीन यांना देखील मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. पायलट आणि त्यांचे काही निकटवर्तीय भाजपच्या षडयंत्रामुळे काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी राजस्थानमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मला दु:ख झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment