स्वस्त सोन्याचे अमीष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – स्वस्तात सोने देतो, असे सांगून औरंगाबाद येथील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची 3 लाखांची फसवणूक झाल्याची घटना सोमवारी (दि.29 जुन) दुपारी 2.30 च्या सुमारास शनिशिंगणापूर परिसरात घडली.
याबाबतची फिर्याद गुरूवारी (दि.2) रात्री 10.30 च्या सुमारास शिंगणापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, अक्षय संजय जैस्वाल (वय-26, रा. टापरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांना जताप छगन भोसले, रावसाहेब जताप भोसले उर्फ काळे व त्यांचे दोन साथीदार यांनी विश्वासात घेवून आम्हाला बांधकाम करताना दिड किलो सोने सापडले आहे. ते स्वस्तात देतो, असे सांगुन विश्वास संपादन केला व त्यांना नेवासा तालुक्यातील फत्तेपुर गावच्या शिवारात बोलावले. अक्षय जैस्वाल तेथे आल्यावर त्यांच्याकडील अडीच लाख रूपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल, 15 हजार रूपये किंमतीची 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे 3 लाखांचा ऐवज हिसकावून घेतला व गजाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी अक्षय जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंगणापुर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 397, 420 प्रमाणे ठगबाजीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भोये हे करीत आहेत.
Post a Comment