विद्यार्थ्यांना दिलासा : पुणे विद्यापीठाने दिले महाविद्यालयांना 'हे' निर्देश



माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - शासनाकडून ज्या अभ्यासक्रमाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये.
तसेच ज्या अभ्यासक्रमाच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जात नाही, अशा अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, विहित शुल्क भरण्याबाबत पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश पुणे विद्यापीठाने विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालये/ मान्यताप्राप्त परिसंस्थांना दिले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांनी एक रकमी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. दोन ते तीन हप्त्यात शुल्क भरण्यासाठी मुभा द्यावी असे आदेश विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क जमा करा, अन्यथा प्रवेश मिळणार नाही असे म्हटले होते. यानंतर पुणे विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक एक रकमी घेऊ नये, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश दिले आहेत.

करोना लॉकडाउनमुळे पालक, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिस्ती वाईट आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना एक रकमी शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही. सध्याची आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा पाहता विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याबाबत पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी हे परिपत्रक काढले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

या प्रवेश प्रक्रियेवर नजर ठेवून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे विद्यार्थी आणि पालकांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post