योजना ‘छोटी’, फायदा मोठा !
माय अहमदनगर वेब टीम
बचतीतून पैसा वाढवणे, ही भारतीयांची जुनी सवय आहे. यासाठी बँकांबरोबरच टपालखात्यालाही पसंती दिली जाते. पोस्टाची छोटी बचत योजना ही गुंतवूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या बँकांच्या मुदतठेवींमधून मिळणार्या व्याजाचा दर कमी होत आहे. त्यामुळे पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममधून बँकांच्या एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळत आहे. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याचबरोबर यामध्ये जमा केल्या जाणार्या पैशांवर सॉव्हरेन गॅरंटी देखील आहे.
पोस्टाची टाइम डिपॉझिट खाते ही योजना छोट्या बचतीसाठी फायद्याची आहे. या खात्यामध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी पैसे जमा करता येतात. या योजनेत बँकांच्या तुलनेमध्ये एफडीवरील व्याजदर 1.40 टक्क्यांनी जास्त आहे. उदाहरणच घ्यायचे तर, एसबीआयमध्ये 5 वर्षाच्या एफडीवर 5.3 टक्के वार्षिक व्याज आहे. तर पोस्टाच्या टाइम डिपॉझिट या योजनेचे वार्षिक व्याज 6.7 टक्के आहे.
टाइम डिपॉझिट खात्यासाठीचे व्याजदर या खात्यातील 1, 2 आणि 3 वर्षाच्या एफडीसाठी 5.5 टक्के व्याज मिळते; तर 5 वर्षाच्या एफडीसाठी 6.7 टक्के व्याज मिळते. या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये जमा केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी साधारण 10.47 वर्ष म्हणजेच 129 महिने लागतात. या योजनेत रोख रक्कम किंवा चेकच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याच्या तारखेपासून तुमचे खाते सुरू होईल.
खाते काढण्यासाठी कमीत कमी रक्कम 1000 रुपये इतकी असून जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. हे खाते सुरू करताना नॉमिनेशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या ऑफिसमध्ये खाते ट्रान्सफर देखील करता येते. मात्र प्रीमॅच्यूअर विथड्रॉल करायचे असेल तर दंड भरावा लागतो. टाइम डिपॉझिटवर जमा रकमेवर इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80 सी अंतर्गत करामध्ये सूट मिळते.
Post a Comment