शहरात तातडीने धूर फवारणी करा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरात तसेच उपनगरी भागात कोरोनाच्या पाठोपाठ आता डेंगू, मलेरिया सारख्या आजारांची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क करून प्रभागनिहाय धूर फवारणी, औषध फवारणी सारख्या उपाययोजना तातडीने सुरु कराव्यात अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेवून चर्चा केली. तसेच यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,नगर शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शहरातील सर्व भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नत निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती निर्माण होत आहे.
त्यामुळे डेंगू, मलेरियाची साथ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी नगर शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण झाली होती. त्यातून नागरिकांचा मृत्यूही झाला होता. असा प्रकार पुन्हा नगर शहरात होऊ नये याची दक्षता या वर्षात घेण्यात यावी. यासाठी नगर शहरातील सर्व भागांमध्ये औषध व धूर फवारणी करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नच निर्माण होऊ नये या दृष्टीने महापालिका प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अन्यथा कोरोना बरोबरच शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण होईल.
तरी लवकरात लवकर प्रशासनाने उपाय योजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांच्यासह मळू गाडळकर,अमित औसरकर यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते.
Post a Comment