कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनान उचलणार कठोर पावले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – अहमदनगर जिल्हयात लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून एकूण कोरोना बाधितांची संख्या ५०० च्या पुढे गेल्याने शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. काही कालावधी साठी कडक लॉकडाऊन करण्याचा विचारही पुढे आला आहे. यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही दुजोरा दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात २४ मार्च पासून ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे नगर शहरासह जिल्हयात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात होती. मात्र १ जून पासून अनलॉक -१ सुरु झाले आणि लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता आली. शहरातील बाजार पेठ तसेच विविध उद्योग व्यवसाय सुरु झाले. शहरात गर्दी वाढली. बाहेरून पुणे, मुंबई सारख्या रेड झोन मधूनही मोठ्या प्रमाणात नागरिक शहरासह जिल्हयात आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. गेल्या ८-१० दिवसांत नगर शहरात तर अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे शहरासह जवळील भिंगार मध्ये तब्बल ६ कन्टेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. शहरात विविध भागात कोरोना बाधित आढळून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी (दि.२) दुपारी महापालिका, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा,यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना कराव्या लागतील असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सूचित केले. या बैठकीत काही कालावधी साठी कडक लॉकडाऊन करण्याबाबतचा विचारही पुढे आला. मात्र या मुळे काय काय चांगले – वाईट परिणाम होतील, नागरिकांची कोणकोणती गैरसोय होईल. त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग कसा रोखता येईल, यावर स्थानिक पातळीवर काय काय करता येईल याचा सर्वंकष विचार करून निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या सर्व चर्चेबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला.
Post a Comment