कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचवणार



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - रिलायन्स समुहाच्या ४३ वर्षांतील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिहासात प्रथमच बुधवारी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी यांनी मार्गदर्शन केले. कोरोनावरील लढाई दीर्घकाळ चालणार असून त्यावरील लस उपलब्ध होताच ती देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशन करेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

समुहाच्या संचालक म्हणून निता अंबानी म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत फाऊंडेशनने देशात ६० लाख लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. रिलायन्स फाऊंडेशन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोरोनावरील लस सापडल्यानंतर ती सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्यासाठी फाऊंडेशन प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करेल. अद्याप लढाई संपलेली नाही. म्हणूनच फाऊंडेशन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत मिळून कोरोना चाचणी करण्याचे काम करत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य असल्याने देशात ऑलिम्पिक स्पर्धा भरण्याचे स्वप्नही निता अंबानी यांनी यावेळी बोलून दाखवले. त्या म्हणाल्या की, देशातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च कामगिरी बजावताना मला पाहायचे आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ४१ देशांतील ४६०हून अधिक शहरांतून सुमारे ३ लाख १० हजार लोकांनी लाईव्ह सहभाग घेतला.

कामांचा आढावा

नीता अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रथमच भाषण देताना कोरोना काळात सुरू असलेल्या कामांबद्दलही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, देशातील १०० खाटांचे पहिले कोरोना विशेष रुग्णालय रिलायन्स समूहाने मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात तयार केले. आज त्या रुग्णालयाची क्षमता २५० खाटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. संकटाच्या काळात देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी करत असलेल्या कामामुळे माणुसकी जीवंत असल्याचे निदर्शनास येते. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण दिवसाला एक लाख पीपीई कीट्स आणि एन९५ मास्क तयार करत असल्याचे अंबानी यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post