...मग मुख्यमंत्री ठाकरे यांनी विठ्ठलाला साकडं का घातलं - दरेकर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला होणार आहे. यावर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे. पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपानं आक्रमक झाली आहे. जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी करोना नष्ट होण्याचं साकड का घातलं?, असा सवाल भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.
आम्हाला वाटते की करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल, असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौर्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील करोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून करोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील करोना जाऊ दे असे साकडे का घातले? त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय?, असा सवाल दरेकर यांनी पवार यांना केला आहे.
Post a Comment