एका दिवसात महाराष्ट्रात १७६ जणांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या आठवड्याभरापासून उच्चांकी वाढ नोंदवण्यात येत आहे. दररोज सरासरी ३५ हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून येत असल्याचे चिंता वाढली आहे. गेल्या एका दिवसात तब्बल ३७ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडली आहे.तर, ६०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ नोंदवण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार मंगळवारी सकाळपर्यंत ३७ हजार १४८ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ५८७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. सोमवारी दिवसभरात तब्बल २४ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवल्याने त्यांना विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ११ लाख ५५ हजार १९१ झाली आहे. यातील ७ लाख २४ हजार ५७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ४ लाख २ हजार २२९ कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २८ हजार ८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत १२ हजार ७० ने वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर मंगळवारी सकाळी ६२.७२ टक्के नोंदवण्यात आला.
कोरोना प्रभावित महाराष्ट्रात सर्वांधिक ८ हजार २४० कोरोनाग्रस्तांची नोंद घेण्यात आली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडू (४,९८५), आंधप्रदेश (४,०७४), कर्नाटक (३,६४८),पश्चिम बंगाल (२,२८२) तसेच आसाममध्ये (१,३८३) मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण आढळून आले. या राज्यांपाठोपाठ तेलंगणा (१,१९८), बिहार (१,०७७), गुजरात (९९८), दिल्ली (९५४), केरळ (७९४) तसेच केंद्रशासित जम्मू-काश्मीर मध्ये (७५१) कोरोनाबाधितांची संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.
तर, सोमवारी महाराष्ट्रात १७६, कर्नाटक ७२, तामिळनाडू ७०, आंधप्रदेश ५४, उत्तर प्रदेश ४६, पश्चिम बंगाल तसेच दिल्लीत प्रत्येकी ३५, गुजरात २०, मध्य प्रदेश १७ आणि जम्मू-काश्मीरमध्ये १० कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला. या राज्यांपाठोपाठ राजस्थानमध्ये ९, पंजाब ८, तेलंगणा ७, हरियाणा तसेच ओडिशात प्रत्येकी ६, झारखंडमध्ये ४, उत्तराखंड ३, त्रिपुरा-मेघालय मध्ये प्रत्येकी २ आणि आसाम, गोवा, छत्तीसगड, केरळ, पॉन्डेचेरी मध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ८१ हजार ३०३ नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ३३ हजार ३९५ तपासण्या या सोमवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे.
देशातील कोरोना तपासण्यांचा वेग वाढला
देशात दर दहालाख लोकसंख्येमागे १० हजार १७९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहे. देशात सर्वाधिक तपासण्या या गोवा राज्यात करण्यात येत आहेत. राज्यात दर दशलक्ष लोकसंख्येमागे ६६ हजार २६१ नागरिकांच्या तपासण्या केल्या जात असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गोवा पाठोपाठ केंद्रशासित दादरा, नगर, हवेली (६२,५७०), लडाख (५४,२७६), अंदमान-निकोबार (४५,६७७), दिल्ली (४४,३६९), लक्षद्वीप (३०,८९५) तसेच जम्मू-काश्मीरमध्ये (२९,२५४) दर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहे.
Post a Comment