गांधी कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेणं दुर्दैवी



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - प्रियंका गांधींनी त्यांची आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांच्या हत्या पाहिल्या आहेत. गांधी कुटुंबावरील संकट अद्यापही टळलेले नसताना त्यांची सुरक्षा काढून घेणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. याबाबत व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारनं त्यांना नवी दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश बुधवारी दिले. यावर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाची एक भूमिका असते. जनतेच्या हिताचे प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. ते काम काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, प्रियांका गांधी व राहुल गांधी करत आहेत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं केंद्र सरकारकडं नाहीत. त्यामुळं विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. पण त्यांनी असे कितीही प्रयत्न केले तरी जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही व आमचे नेते विचारत राहणार, अलीकडच्या काळात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. केंद्र सरकार ज्या चुका करतंय, त्याबद्दल प्रियांका या सरकारला प्रश्न विचारत आहेत. हे प्रश्न त्यांनी विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही हे दिसत आहे.

दरम्यान प्रियांका गांधी-वाड्रा यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस मोदी सरकारनं बजावली आहे. बंगला रिकामी करण्यासाठी त्यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतरही सरकारी बंगल्यात राहिल्यास भाडं किंवा दंड भरावा लागेल, असंही सांगण्यात आलं आहे. एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं कारण नोटिशीत देण्यात आलं आहे. त्यावरून काँग्रेस व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post