गुगल-जिओच्या भागीदारीचा चिनी कंपन्यांना धसका
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - जिओ आणि गुगल यांच्या भागीदारीमुळे भारतीय बाजारात स्थिरावलेल्या चीनच्या कंपन्यांनी धसका घेतला आहे. अलिकडेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुगलसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली असून गुगल कंपनी जिओचे 33 हजार कोटी रुपयांचे समभाग विकत घेणार आहे.
गुगल व जिओ मिळून अॅण्ड्रॉईड आधारित एक स्वस्त फोन बाजारात आणणार आहेत. त्यामुळे शाओमी, रिअलमी, ओप्पो, विवो यांसारख्या चीनच्या कंपन्यांनी धसका घेतला आहे. सध्या भारतीय बाजारात या चिनी कंपन्या लोकप्रिय असून त्यांच्या उत्पादनांचे वर्चस्व आहे. बाजारातील हिस्सेदारीच्या बाबतीतसुद्धा चीनच्याच कंपन्यांचा दबदबा आहे.
मध्यम व महाग किमतीच्या गटातदेखील चीनच्या कंपन्या आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जिओ व गुगल एक नवा परवडणारा फोन आणणार असल्यामुळे पहिल्यांदाच चीनच्या कंपन्यांना चिंता जाणवू लागली आहे. कारण, बाजारात उडी घेतल्यानंतर संपूर्ण समीकरणे बदलण्याची जिओची ख्याती आहे. त्यामुळे फोनच्याही बाबतीत हेच घडणार यात दुमत नाही. यात विशेष म्हणजे सध्या चीनविरोधी भावनाही जिओ आणि गुगलला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते.
जिओ व गुगल यांच्यात झालेल्या करारानुसार एक परवडणारा फोन तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा फोन आणण्याची गुगलची पहिलीच वेळ नाही. गुगलचा अॅण्ड्रॉईड गो हा प्लॅटफॉर्म आहे. पण गुगलला आतापर्यंत जिओची कमतरता भासत होती, असेच चित्र आहे. या सगळ्यात 5-जी विसरून चालणार नाही, जो सर्वात महत्त्वाचा भाग असेल. जिओने स्वतः 5-जी विकसित करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिओ 5-जी फोन आणणार यातही शंका नाही.
जिओने जगातील सर्वात मोठी चिपमेकर कंपनी क्वालकॉमसोबतही भागीदारी केली आहे. यावरूनच दिसते की स्मार्टफोन बाजारात जिओ किती ताकदीने उतरणार आहे. गुगल व क्वालकॉमच्या मदतीने जिओ हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे. आता गुगल व क्वालकॉमची साथ चीनच्या कंपन्यांची चिंता वाढवण्यास पुरेशी आहे.
Post a Comment