शहरातील स्वच्छतेची आ.जगताप यांनी केली पाहणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पावसाळ्यापूर्वी नगर शहरातील बंद गटारी व नाल्यांमधील साचलेला गाळ काढण्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचार्यांची दि. 6.7.2020 रोजी बैठक घेऊन विविध सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी काम सुरु आहे. गाळ काढल्यानंतर पावसाचे पाणी गटारी व नाल्यांमधून वाहण्यास प्रवाह मिळतो. अन्यथा पाणी साचल्यानंतर डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पावसाळ्यामध्ये विविध साथीचे आजार पसरण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील सर्वच भागामध्ये स्वच्छता मोहिम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर रस्त्यावरील फुटपाथ व रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गवत काढण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
महापालिकेचे कर्मचारी या पार्श्वभूमीवर शहरामध्ये काम करत आहे, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. गटारी व नाले सफाई कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप. समवेत आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह पैठणकर, उबेद शेख, बाबासाहेब गाडळकर, गोरख पडोळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, नगर शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूने थैमान घातले आहे. शहरातील सर्व भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत.
या काळात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती निर्माण होत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरियाची साथ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी नगर शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण झाली होती. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने उपाय योजना सुरू आहेत. कोरोना बरोबरच शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment