बनावट सोनं खरं असल्याचं भासवून बँकेतून घेतलं लाखोंचं कर्ज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - बँकेत सोने तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या गोल्ड व्हॅल्युअरच्या मदतीने बनावट सोने खरे असल्याचे भासवत बँकेतून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी काल रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित बँकेच्या गोल्ड व्हॅल्युअरसह २४ जणांच्या विरोधात ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीतील जना स्मॉल बँकेच्या शाखेत २६ ऑक्टोबर २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला आहे.
नगरच्या सावेडी उपनगरात जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या बँकेची शाखा आहे. या बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर म्हणून लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर हा काम पाहत होता. सोने तारण कर्जासाठी सोन्याचे दागिने घेऊन एखादी व्यक्ती आल्यानंतर संबंधित दागिने तपासून त्याची व्हॅल्यू काढून देत असे. तसे प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीला देण्याचे काम गोल्ड व्हॅल्युअर म्हणून तो करीत होता. मात्र, देडगावकरनं तब्बल २३ जणांना त्यांनी आणलेले धातुचे दागिने खरे सोन्याचे आहेत, अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. संबंधित २३ जणांनी या बनावट प्रमाणपत्राच्या वापर करून बनावट दागिन्यांवर बँकेमध्ये वेगवेगळी ३८ सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँकेकडून २२ लाख २० हजार ३०० रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर याच्यासह इतर २३ जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिलिंद मधूकर आळंदे यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.
वारजे माळवाडी येथील मणिपुरम गोल्ड फायनान्स कंपनीत बनवाट सोने तारण ठेवून तीन लाखांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका तरुणाला अटक केली होती. नीलेश शांताराम सुर्वे (वय ४०, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव होते. वारजेतील एनडीए रस्त्यावर मणिपुरम गोल्ड फायनान्सची एक शाखा आहे. या ठिकाणी आरोपीने १६ जून रोजी बनावट सोने देऊन तीन लाख १५ हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतले होते. यावेळी त्याने स्वतः चे नाव देखील खोटे सांगितले होते. त्यानंतर तो पुन्हा एकदा सोने परत घेण्यासाठी देखील आला होता. पण, तो परत गेला. फायनान्स कंपनीकडून आलेल्या सोन्याचे ऑडिट करण्यात येत होते. त्यावेळी आरोपीने दिलेले सोने हे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यावेळी आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आला होता. फायनान्स कंपनीकडून तात्काळ याची माहिती वारजे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सहायक निरीक्षक नितीन बोधे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले.
Post a Comment