तो निर्णय निर्णय एकतर्फी नाही
माय अहमदनगर वेब टीम
बारामती - प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापक लोकहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून तो एकतर्फी नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
खासदार गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली होती. एकाही आमदार, खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे बापट म्हणाले होते. त्याचा पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनची गरज प्रशासनाकडून व्यक्त होत होती. पुण्यातील स्थिती आटोक्यात येण्यासाठी व्यापक विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिका-यांनाही याची कल्पना होती. काही लोकप्रतिनिधींशी यासंबंधी फोनवरून बोलणे केले होते. पुण्याच्या महापौरांनाही कल्पना दिलेली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी नसल्याचे पवार म्हणाले.
लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेकांना त्रास सहन करावा लागतो याची जाणीव आहे, परंतु नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले.
Post a Comment