आता प्रतिबंधीत क्षेत्रालगतचा परिसरही सील होणार
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक -करोना विषाणूचा प्रादुर्भाव महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला असल्याने नागरिकांत निर्माण झालेली भिती दूर करण्याबरोबर प्रतिबंधीत क्षेत्रालगतचा परिसर सील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १ डझन प्रतिंबंधीत क्षेत्राचा परिसर वाढविण्यात आला असुन यामुळे करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रतिबंधीत क्षेत्राचे निकष बदलले असुन आता पूर्वी प्रमाणेच प्रतिबंधीत क्षेत्रालगतचा परिसर - रस्ते सील (सील) करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार शहरातील १२ प्रतिबंधीत क्षेत्रांच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. यात पंचवटीतील हिरावाडी, जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, जोशीवाडा, इंदिरानगर, पखालरोड, पांडवनगरी, नाशिकरोड येथील गोसावी वाडी, शिखरेवाडी व जयभवानी रोड नाशिकरोड या भागांचा समावेश आहे.
करोना प्रादुर्भांच्या पहिल्या टप्प्यात शहरात एक रुग्ण आढळून आल्यानंतर बाधीत रुग्णांचे घर किंवा इमारत केंद्रबिंदु मूनन चारही बाजुंनी १०० मीटर परिसर सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यात आणि बाहेरील व्यक्तीस या भागात प्रवेश दिला जात नव्हता. याचा चांगला परिणाम एप्रिल व मे महिन्यात शहरात दिसुन येत रुग्ण संख्या रोखण्यात आली होती. पुढच्या काळात बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती आणि वृध्दांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसुन आले.
रुग्णांची संख्या जुन महिन्यापासुन वाढत गेली. प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाल्यानंतर परिसरातील इतर नागरिकांनी वेठीस ठरले जात असल्याच्या कारणावरुन शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राचे निकष बदलले होते. यानुसार रुग्ण राहत असलेली इमारत किंवा बंगला सील करण्यात आले. परिणामी रुग्ण राहत असलेल्या भागात नागरिकांची ये-जा सुरु केली. तसेच पुढच्या टप्प्यात शासनाने पुन्हा प्रतिबंधीत क्षेत्राचे निकष बदलत इमारतीतील बाधीत रुग्णांचे घर सील करीत इमारतीतील इतर कुटुंबातील निर्बंध हटवून टाकले. अशाप्रकारे निकष बदलल्यामुळे आता शहरात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका प्रशासनाचे काम वाढले आहे.
Post a Comment