शांताबाई पवार यांना मदत करणा-यांवर 'या' कारणामुळे भडकले दिग्दर्शक केदार शिंदे, म्हणाले - लाज वाटायला हवी आपल्याला
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना संकटाच्या काळात उदरनिर्वाहासाठी पुण्यातील रस्त्यांवर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करणा-या 85 वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. शांताबाई पवार असे या आजीबाईंचे नाव आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक जण त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मात्र त्यांना मदत करताना अनेकांनी मदतीचे व्हिडिओ काढले. इतकेच नाही तर त्यांना पुन्हा त्या कसरती करण्याची मागणीही केली. यावरुन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
“त्या आजीचा व्हिडीओ गाजतोय. चहूबाजूने मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायेत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडिओ काढणे आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणे किती संयुक्तिक आहे? लाज वाटायला हवी आपल्याला”, असे ट्विट करुन केदार शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सोनू सूदला सुरु करायची आहे प्रशिक्षण शाळा
शांताबाई पवार एकेकाळी चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या. सीता-गीता आणि शेरनी या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे त्या रस्त्यावर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करतात आणि स्वतःसह आपल्या नातवंडांचा उदरनिर्वाह करतात. पुण्यातील हडपसर या भागात राहणा-या शांताबाई यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सुदने पुढाकार घेतला आहे. ‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतील’, असे सोनू म्हणाला आहे. सोनूशिवाय अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांना मदतीचा हात दिला आहे.
गृहमंत्र्यांनीही केली एक लाख रुपयांची मदत
शांताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात असताना त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शांताबाई पवार यांना 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला होता. तसेच साडी चोळीही भेट दिली होती.
Post a Comment