म्हणून संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचू लागले असून नगर तालुक्यातील घोसपुरी या गावात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. गावात आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

गावातील एक व्यक्ती सोमवारी (दि.१३) कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक असे आणखी तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर गावातीलच एक व्यक्ती, त्याची पत्नी व मुलाने दोन दिवसापुर्वी खासगी कोरोना टेस्ट लॅबमध्ये स्राव तपासणीसाठी दिले होते. बुधवारी (दि.१५) रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने चास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी रश्मी शिंदे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी (दि.१६) सकाळी सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्याधिकारी डॉ. सुविधा धामणे, आरोग्य सेविका इंदूमती गोडसे, वर्षा धामणे, आरोग्यसेवक राजाराम वाबळे यांच्यासह पथकाने घोसपुरी येथे जावून बाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तसेच त्यांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तातडीने सुरू केले आहे.

हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करुन काही व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून गावात आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी व इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. घोसपुरी गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने परिसरातील सारोळा कासार, खडकी, बाबुर्डीबेंद, हिवरेझरे, अस्तगाव आदी गावांमधील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान आज गुरुवारी (दि.१६) दुपारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमधील अहवालात घोसपुरी येथील आणखी एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ८ झाली आहे. एकाच गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार उमेश पाटील, तालुका आरोग्य डॉ.ज्योती मांडगे-गाडे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री.आभाळे यांनी घोसपुरी येथे भेट देवून पाहणी केली. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने तपासणी साठी पाठविण्यात यावे. गावात औषध फवारणी करण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच गाव पातळीवरील सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांची बैठक बोलावून सर्वांना सुचित केले की पुढील १४ दिवस संपूर्ण गाव संपूर्ण सेवेसह बंद राहील. यामध्ये कोणीही टाळाटाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर अथवा पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post