नियमाप्रमाणे दर आकारा - जिल्हाधिकारी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दर फलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय ही कोरोना आजारावर उपचार करत आहेत. अशा रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच अवास्तव शुल्क त्यांच्याकडून आकारले जाऊ नये यासाठी राज्य शासनाने अशा रुग्णालयांसाठी उपचाराच्या अनुषंगाने जर निश्चित करून दिले आहेत. या रुग्णालयांनी कोविड-१९ उपचाराच्या संदर्भातील हे दर पत्रक त्यांच्या रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. जेणेकरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती होऊ शकेल. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत.
ज्याप्रमाणे खाजगी प्रयोगशाळांना कोविड-१९ चाचणीसाठी राज्य शासनाने दर आकारणी निश्चित केली आहे, त्याच पद्धतीने कोविंड संदर्भात उपचारांसाठी ही राज्य शासनाने दर ठरवून दिले आहेत. रुग्णालयांनी त्याच पद्धतीने शुल्क आकारणी करावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी आकारणी केली जाऊ नये, सर्वसामान्य रुग्णांचे हित जपले जावे, यादृष्टीकोनातून हे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहणार आहे.
खासगी रूग्णालयांनी कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करू नये, यासाठी शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.
या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत
Post a Comment