राज्यात दर पाचव्या दिवशी वाढताहेत १ हजार कोरोना बळी



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या 25 दिवसांपासून राज्यात प्रत्येक पाचव्या दिवशी 1 हजार बळी वाढत आहेत. देशातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या महाराष्ट्राने कोरोना संसर्ग आणि बळींच्या बाबतीत जगातील अनेक देशांना मागे टाकले आहे. जर्मनीमध्ये 9069, तर कॅनडामध्ये 8811 बळी गेले आहेत. जगात जेथून कोरोनाचा उद्रेक झाला त्या चीनचे बळीदेखील महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक कमी म्हणजे 4641 नोंदवले गेले आहेत.

देशातील 22,123 बळींमध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 45 टक्के इतका आहे. 16 जूनला महाराष्ट्रातील कोरोना बळींचा आकडा 5,537 होता. याचदिवशी सार्वजनिक आरोग्य विभागाने या आकड्यात थोडी सुधारणा केली आणि एका दिवसातच हा आकडा 1,329 ने वाढला. महाराष्ट्र सरकारने कोरोना मृत्यू दडवल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

16 जूननंतर अवघ्या पाच दिवसांत राज्यातील कोरोना बळींचा आकडा 5,537 वरून 6,170 वर पोहोचला. सुरुवातीला मुंबईत वेगाने फैलावणारा कोरोना नंतरच्या काळात मुंबईला लागून असणार्‍या ठाणे जिल्ह्यात पसरला. 16 जून रोजी एमएमआर विभागात केवळ 641 बळी नोंदवले गेले होते.

आता केवळ ठाणे जिल्ह्यातच 1,598 बळी आहेेत. 16 जूनपूर्वी मुंबईत 3,137 कोरोना बळी होते. 16 जूननंतर त्यात 2,077 ची भर पडली. मेच्या दुसर्‍या आठवड्यानंतर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होऊ लागली, अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ आणखी दोन आठवडे तशीच राहील. विशेषकरून एमएमआर विभाग, पुणे, जळगाव आणि औरंगाबाद येथील रुग्ण झपाट्याने वाढतील, असे डॉ. जोशी म्हणाले. दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका डॉक्टरनी सांगितले की, चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे बाधित मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महाराष्ट्रात सध्या 110 चाचणी केंद्रे उपलब्ध आहेत.

देशातील एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के कोरोना बळी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. सुदैव इतकेच की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा बर्‍यापैकी सक्षम आहे, त्यामुळे बाधितांच्या तुलनेत मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post