'मातोश्री’ पुन्हा एकदा करोनाच्या सावटाखाली



मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवसास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर पुन्हा एकदा करोनाचे सावट पसरले आहे. मुख्यमंत्र्याचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या सुरक्षारक्षकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मरोळ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र, या सगळ्यामुळे तेजस ठाकरे यांना फारसा धोका नाही. कारण, तेजस ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेरच पडले नाहीत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा सुरक्षारक्षकांशी थेट संपर्क आला नव्हता. यापूर्वी मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.

त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडणे शक्यतो टाळत आहेत. मात्र, याच कारणामुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. तत्पूर्वी आज सकाळीच ठाकरे सरकारमधील चौथ्या मंत्र्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post