हेल्थ डेस्क - कोरोनाकाळात रोगप्रतिकार क्षमता चांगली राहावी, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. काय खावे, काय खाऊ नये. आहारात कुठल्या घटकांचा समावेश असावा. भाजीपाला, फळे यांची कशी काळजी घ्यावी, आदींबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत. लॉकडाउनमध्ये अनेकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून भरपेट त्याचा आस्वाद घेतलाय. या सर्व पदार्थांनी उदरभरण झाले की जीवनसत्वेदेखील मिळालीत, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व शंकाकुशंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न इंडियन डायटेटिक असोसिएशनच्या नागपूर चाप्टरच्या अध्यच कविता बक्षी यांनी केला आहे.
- रोजच्या आहारामध्ये कुठल्या घटकांचा समावेश असावा?
रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात प्रथिनांचा सर्वाधिक प्रयोग करायला हवा. यामध्ये अंडी खाणे चांगले आहे. अंडी न खाणाऱ्यांनी डाळींचे सेवन करावे. शक्यतो कॉम्बिनेशनमध्ये जेवण करायला हवे. रोजच्या जेवणात आपण वरण आणि भाताच्या माध्यमातून डाळ, तांदूळ यांचे सेवन करतो. पण या दोहोंचे मिश्रण असलेली खिचडी घेतल्यास त्याचा फायदा अधिक होतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ, व्हिटॅमिन सी देणारी लिंबू, संत्री असायला हवीत. प्रथिने आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक आहेत. याला आपण इंग्रजीत इम्युनिटी बूस्टर असेदेखील म्हणतो.
-लॉकडाउनमध्ये अनेकांच्या पोटाचा घेर वाढला आहे. अशात जेवणामध्ये फॅटयुक्त पदार्थ असावेत का?
फॅटयुक्त पदार्थ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाण्यास काहीच हरकत नाही. विशेषत: शुद्ध तुप, लोणी यांचा आहारात समावेश असायला हवा. तेलामध्ये ग्राउंडनट आणि राइसब्रान ऑइलचा उपयोग करावा. यासोबत अॅण्टी व्हायरल पदार्थ घेण्यास हरकत नाही. त्यामुळे शरीरात जाणाऱ्या अन्नपदार्थांचे संतुलन चांगले राहते. हळद, कलमी, सुंठ, तुळस यांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा मिळून बनणारा काढा घेणे उपयोगी आहे. शिवाय या पदार्थांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारात समावेश असलेले पदार्थ खायला हवेत. लॉकडाउनमध्ये अनेक गृहिणींनी भरपूर निरनिराळे पदार्थ बनवून घरातील मंडळींचे मन जिंकले आहे. आता गृहिणींनी अन्नपूर्णा होण्यासोबतच 'न्युट्रीपूर्णा' होण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रीय घरगुती जेवणाला संतुलित आहार म्हणून मान्यता मिळालेली आहे. तेव्हा त्या जुन्या पद्धतीच्या जेवणावर अधिक भर द्या.
- बाहेरून भाजीपाला, फळे आणल्यानंतर कुठली काळजी घ्यावी?
भाजीपाला, फळे आणलेली पिशवी घराबाहेर, गॅलरीत वा दारापुढे न ठेवता एका कोपऱ्यात चार तास ठेवळा. त्यानंतर मीठ, हळद घातलेल्या पाण्याने ते धुवून घ्या. यासाठी कोमट पाणीदेखील वापरता येईल. स्वच्छ धुतल्यानंतरच त्याचे सेवन करा. मोसमी फळे, भाजीपाल्यांना अधिक प्राधान्य द्या. कॅनमध्ये असणारा ज्युस, डबेबंद असणारे सरबत, जॅम, केचप, लोणची टाळा. शक्यतो हे पदार्थ घरी बनविण्याचा प्रयत्न करा. बाहेरच्या वस्तूंना प्राधान्य देऊ नका.
Post a Comment