मृत्युदर रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : मुख्यमंत्री



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी येणार्‍या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणार्‍या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जालना येथील कोव्हिड- 19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत आहेत. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे.

मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणार्‍या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहचली आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणार्‍या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.

1 कोटी 7 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून दररोज 500 तपासण्या केल्या जातील. जास्तीत जास्त चाचण्या करून कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच बाधितांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे. प्लाझ्मा थेरपी व अ‍ॅन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post