श्रीगोंदा : उपसभापती पाचपुते व संचालक नाहाटा आमने-सामने
माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा - कृषिउत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा शुक्रवार दि. 24 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वीच उपसभापती वैभव पाचपुते यांनी कोव्हिड-19 या करोना साथीच्या आजारामुळे सभा घेऊ नये, असे पत्र तहसीलदारांना दिले असल्याने तहसीलदारांनी या करोनाच्या काळात सभा घेण्याबाबत पत्र बाजार समितीला दिले असल्याने संस्थेचे सचिव संभ्रमावस्थेत आहेत.
परंतु गेल्या 15 दिवसांत श्रीगोंदा बाजार समितीने अनेक कार्यक्रम उपसभापती वैभव पाचपुते यांच्या उपस्थित केले असल्याने याला अडचण आली नाही. मात्र आता संचालक मंडळाची सभा घेण्यास तहसीलदार महेंद्र माळी यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत, असे संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
येत्या 24 जुलै रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक होत असून यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यात सचिवाने वाढविलेल्या पगारासह पणन संचालकांचे पत्र, ज्या लिंबू व्यापार्यांचे लायसन्स रद्द केले त्यासह अन्य विषयांसाठी ही बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वी उपसभापती वैभव पाचपुते यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना पत्र दिले आहे.
करोना महामारीच्या काळात ही बैठक होऊ नये, यामुळे करोना संसर्ग होऊ शकतो, असे म्हटले आहे. या पत्रामुळे तहसिलदारांनी बाजार समितीच्या सचिवांना दिलेल्या आदेशात जिल्हाधिकार्यांचा आदेश असल्याने या करोना काळात एकत्र येण्यासाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मात्र आता तहसीलदारांना संचालक बाळासाहेब नाहाटा यांनीही पत्र दिले असून यात उपसभापतींनी यापूर्वी ज्याला 500 ते 1000 लोक उपस्थित होते, असा कार्यक्रम होऊ दिला. बाजार समितीचे उपसभापती हे काष्टी येथील रहिवासी आहेत.
सध्या काष्टी गावात करोना रुग्ण सापडलेले आहेत. तसेच काष्टी गाव आपण लॉकडाऊन केलेले आहे. तरीही मंगळवार 21 जुलै रोजी गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचा लिंबू खरेदी शुभारंभ बाजार समितीच्या आवारात समितीचे उपसभापती वैभव पांडुरंग पाचपुते यांच्या उपस्थितीत पार पडला. यामुळे करोना विषाणुचा प्रादुर्भाव होतो किंवा नाही, याबाबत आपण संभ्रमात आहोत.
तसेच श्रीगोंदा बाजार समितीच्या दोन मासिक सभा यापूर्वी उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या आहेत. सदर मासिक सभेवेळी कोविड-19 आजाराची आठवण झाली नाही का? तसेच त्यांनी 18 जुलै 2020 च्या अर्जात तालुक्यातील बहुतांश संचालकांच्या गावात करोना संसर्ग झाल्यामुळे सभा घेऊ नये, असा उल्लेख केलेला आहे.
करोनाच्या नावाखाली सभा न घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या हितास बाधा निर्माण होत आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांनी 21 जुलैच्या पत्रान्वये 24 जुलैची संचालक मंडळाची मासिक सभा घेण्यास परवानगी दिलेली आहे. तरी तहसीलदारांनी बाजार समितीच्या सचिवांना बाजार समिती कायद्यातील व पोटनियमांतील तरतुदीप्रमाणे मासिक सभा घेण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, असे नाहाटा यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोविड-19 या महामारीमुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाशिवाय कुणी एकत्र येऊ नये. चुकीचे काम करणार्या व्यापार्यांचा बचाव कुणी करू नये. ज्या व्यापार्यांकडून येणे बाकी आहे, ते वसूल करावे. यानंतर ही बैठक होऊ शकते, असे उपसभापती पाचपुते म्हणाले.
Post a Comment