महाराष्ट्र एसटीच्या साडेचार हजार वाहक-चालकांच्या नियुक्तीला स्थगिती
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्य परिवहन महामंडळाने 2019 मध्ये घेतलेल्या सरळसेवा भरती अंतर्गत रुजू केलेल्या चालक आणि वाहकांच्या नेमणुकीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसा आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संबंधित विभागांना दिला आहे.
या आदेशामुळे 4 हजार 500 कर्मचार्यांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे. शेखर चन्ने यांनी काढलेल्या आदेशानुसार कर्मचार्यांची सेवा स्थगित करण्यात येणार असताना भविष्यात आवश्यकता भासल्यास या कर्मचार्यांना पुन्हा महामंडळात सामावून घेण्यात येइल, असेही नमूद करण्यात आलेले आहे. परत सेवेत घेताना सेवाज्येष्ठतचा निकष लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरळसेवा भरती अंतर्गत चालक, वाहक, सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग व अनुकंपा तत्वावर अनेक उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. या उमेदवारांचे प्रशिक्षणही पुढील आदेशापर्यंत आजपासूनच स्थगित करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने ऐन लॉकडाऊन काळात हजारो एसटी कर्मचार्यांपुढे रोजगाराचा गहन प्रश्न उभा ठाकणार आहे.
दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या निर्णयावर कामगार संघटनांमधून तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात हा प्रश्न चिघळणार असेच चिन्ह आहे.
Post a Comment