डेंग्यूपासून वाचण्यासाठी पावसाळ्यात करा ‘हे’ उपाय
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळा आला की विविध संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. सुरुवातीला सामान्य ताप-सर्दी वाटत असली तरीही नंतर या समस्यांचे रुपांतर डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारात होते. मागच्या काही वर्षांपासून डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे अनेकांचे प्राणही गेले आहे. पावसात साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या एडीस इजिप्ती नावाच्या डासांमुळे हा होतो. डेंग्यूचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. या आजारात खूप ताप येतो, प्रमाणाबाहेर डोके दुखते, हातापायांचे सांधे, हाडे खूप दुखतात आणि महत्वाचे म्हणजे शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर, न खाजणारी पुरळ येते. रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. गंभीर परिस्थितीत लघवी, शौच, थुंकीमधून तसेच शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो. यामध्ये रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होऊन तो दगावू शकतो. सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये पुन्हा या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पाहूयात या आजारापासून दूर राहण्यासाठी नेमके काय केलेले उपयुक्त…
१. आपण राहत असलेल्या ठिकाणी दिर्घकाळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. हे डास स्वच्छ पाण्यात होत असल्याने पाणी भरुन ठेवताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
२. डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. घरात डासांचा शिरकाव होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घ्यायला हवी. घरातील जागा जास्तीत जास्त कोरडी राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे.
३. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. त्यामुळे पूर्ण कपडे वापरणे आवश्यक आहे. डेंग्यूचे डास साधारणपणे पायाच्या खाली जास्त चावतात. त्यामुळे पाय पूर्ण झाकलेले राहतील असे पहावे.
४. फ्लॉवर बेड, कुलरमध्ये पाणी वेळच्यावेळी बदला आणि त्यांची वेळेवर साफसफाई करा. पाण्याची भांडी झाकून ठेवा.
५. कोणत्याही फटी, तडे, टायर, भंगारचे सामान यांच्यामध्ये बरेचदा पाणी साचते. या पाण्यातही डास अंडी घालतात. असे होऊ नये म्हणून अशा साठलेल्या वस्तूंची वेळच्या वेळी विल्हेवाट लावावी.
६. थोडा ताप आला तरी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते औषधोपचार करावेत. असे दुखणे अंगावर काढणे महाागात पडू शकते.
७. उकळलेले पाणी प्यावे, ताजे आणि घरी तयार केलेले अन्न खावे.
Post a Comment