बंगळूर : सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त मंत्रिमंडळ विस्तार शक्य



माय अहमदनगर वेब टीम
बंगळूर - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर येऊन 27 जुलै रोजी वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती, एमटीबी नागराज यांना संधी मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळातील एकूण जागांपैकी 28 जागा भरल्या आहेत. आता आणखी 6 जागा रिक्त आहेत. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त या जागा भरण्यासाठी आतापासूनच वरिष्ठांची कसरत आणि इच्छुकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. सध्या मंत्रिमंडळात असणार्‍या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. तसे झाल्याने मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे सरकार सत्तेवर येण्यासाठी काही आमदारांनी त्याग केला होता. त्या सर्वांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता आश्वासनांची पूर्तता केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार कत्ती यांना याआधी दोनवेळा झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी संधी हुकली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी भोजन समारंभाच्या निमित्ताने नाराज आमदारांची बैठक घेतली होती. याची चर्चा नवी दिल्लीपर्यंत झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना यावेळी मंत्रिपद नक्की मिळणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी आल्यापासुन त्यांना सरकार वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. सुरुवातीलाच मंत्रिपदावरुन अनेकदा वाद झाला. त्यामुळे महिन्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले. पोटनिवडणूक झाली. आता कोरोनाविरुद्धचा लढा सुरु आहे. त्यामुळे सत्तेचे पहिले वर्ष संघर्षातच गेले.

आमदारांचा वाढता दबाव

आतापर्यंत अनेकदा मंत्रिपद भोगलेल्यांनी इतरांना संधी द्यावी. ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्यास जातीतील आमदारांसाठी पदत्याग करावा, अशी मागणी इच्छुक आमदारांतून होत आहे. याविषयी वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post