महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे ब्रेन लॉक झाले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे अनलॉक सुरु असल्याचे सांगतात, मात्र दुसरीकडे लॉकडाऊन हटवले नसल्याचे सांगतात. याचा अर्थ सरकारमध्ये संभ्रमावस्था आहे, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे ब्रेन लॉक झाले आहेत, अनलॉक काय करावे व लॉकडाऊन काय करावे हेच त्यांना समजेनासे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारचे व्यवस्थापनच सपशेल चुकल्याने महाराष्ट्रातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, असा आरोपही खा. डॉ. सुजय विखे यांनी केला.
संगमनेरमधील वाढत्या संख्येच्या करोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे आता स्वतंत्र जिल्हाधिकारी नियुक्त करावा, म्हणजे परिस्थिती नियंत्रणात येईल, असा टोलाही त्यांनी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून खासदारांच्या अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे आराखडेही परस्पर मंजूर केले जात आहेत. आराखडे तयार करताना खासदारांना दाखवले जात नाहीत. केंद्र सरकारच्या अनेक योजनेतील कामे हे केवळ राजकीय कारणातून मंजूर केले जातात, प्रशासनाने यापुढे लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवावा, यापुढे आपण हे चालू देणार नाही, असा इशारा खा. डॉ. विखे यांनी दिला.
खा. डॉ. विखे यांनी जिल्हा परिषदेमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला. खासदारांना न कळवता केंद्र सरकारच्या योजनेतील कामांचे यापुढे परस्पर लोकार्पण झाल्यास आपण याबाबत तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषदेत ते पत्रकरांशी बोलत होते.
Post a Comment