गर्दीत कोसळला, पण मदतीला एक हात नाही



माय अहमदनगर वेब टीम
कोल्हापूर - इचलकरंजीत कोरोनाचा कहर सुरू असतानाच उभ्या उभ्या कोसळलेल्या एका किराणा व्यापार्‍याच्या मदतीस कुणीच धावून न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथील आवाडे मळा परिसरात आज (शुक्रवार) घडली. कोरोनाच्या भय आणि धास्तीचा परिणाम नागरिकांच्या मानसिकतेवर झाल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.

इचलकरंजीत कोरोनाग्रस्तांची संख्या शंभरी गाठणार असे चित्र आहे. वाढता फैलाव लक्षात घेऊन 14 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी 6 ते 11 अशी पाच तासांची शिथिलता देण्यात आली होती. याच दरम्यान, येथील आवाडे मळा परिसरात एक व्यक्ती अचानक उभ्या उभ्या कोसळल्याचे नागरिकांनी पाहिले. त्या व्यक्तीपासून काही अंतरावर थांबून नागरिकांनी त्याला पाहण्यास गर्दी केली. मात्र तो अस्वस्थ दिसत असूनही कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस केले नाही.

संबंधित व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोसळला असावा, अशी चर्चाही त्या ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे काही क्षणातच नागरिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यानच या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिवराज सोनी (वय 39) असे या व्यक्तीचे नाव आहे. ते कोल्हापूर नाका येथे वास्तव्यास होते. विकली मार्केट परिसरात त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना कोणता आजार होता हे स्पष्ट नसतानाही कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिकांनी या व्यक्तीची विचारपूस करणे आणि मदतीसाठी त्याच्या नजीक जाण्याचेही टाळले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post