मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे, याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. डिजिटल शिक्षण देताना स्क्रीन टाईमबाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे. मानसिक-शारीरिक थकवा कसा दूर करता येईल याबाबतही माहिती दिली आहे. यात पहिली ते आठवी साठी ऑनलाइन वर्ग ४५ मिनिटाचा करण्यात आला आहे.
‘प्रज्ञाता’ गाईडलाईन्समध्ये प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप्सनुसार ऑनलाईन शिक्षण शिकवतानाच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये प्लान (नियोजन), रिव्हीव्ह (उजळणी करणे), अरेंज (योजना), गाईड (मार्गदर्शन करणे), टॉक (बोलणे), असाईन (अभ्यास करायला सांगणे), ट्रॅक (एक विशेष पद्धतीने अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे), अॅपरीसीएट (दाद देणे) या महत्वाच्या सूचना करून त्या कशा अंमलात आणायच्या याबाबत सांगितले आहे.
करोनच्या काळात पूर्वीसारखे शाळेत दिले जाणार्या शिक्षणाबाबत विचार करत न बसण्यापेक्षा सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून कसे दर्जेदार शिक्षण आपल्याला देता येईल यासाठी या गाईडलाइन्स देण्यात येत आहेत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पूर्वप्राथमिक वर्गासाठी ऑनलाईन स्क्रीन टाईम अर्धातास, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिड तास, आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन तास अशी रोजची कालमर्यादा निश्चित केली आहे.
शिक्षकांनाही दिलासा
शिक्षकांवर ताण येईल इतक्या ऑनलाइन तासिका घेण्याचे काम देऊ नये, असेही यात म्हटले आहे. शिक्षकांच्या मुलांच्याही ऑनलाइन शाळा असतील. त्यासाठी त्यांना संगणक किंवा फोन वापरावा लागू शकतो, याचा विचार करून त्यांच्या कामाचे नियोजन करावे. दिवसातून एका शिक्षकाला २ किंवा ३ तासांपेक्षा अधिक काळ ऑनलाइन तासिका घेण्याचे बंधन घालू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण हे अपंग विद्यार्थ्यांसाठी जिकीरीचे ठरत आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालयाने अशा विद्यार्थ्यांसाठी ई-साहित्य तयार केले आहे. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषांतील चित्रफितींची निर्मिती केली आहे. अंध विद्यार्थ्यांसाठीही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Post a Comment