प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'भाभीजी' पापड खा : भाजप मंत्र्यांकडून सल्ला!
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकार कोरोना विषाणूबाबत खोटी आणि चुकीची माहिती पसरवू नये म्हणून सतत आवाहन करत असते. पण, तरीही काही लोक या महामारीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्नपूर्वक चुकीची आणि खोटी माहिती पसरवत आहेत. आता यामध्ये केंद्रीय पाणी आणि नदी विकास मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भर पडली आहे. त्यांनी भाभीजी पापड खाण्याचा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चांगला फायदा होतो असे सांगत अकलेचे तारे तोडले.
मेघवाल यांनी 'आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भाभीजी हे पापड तयार करण्यात आले आहेत. यामुळे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. पापड कोरोना विरुद्ध लढण्यासाठी गुणकारी आहेत.' असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
जेव्हा देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळी देशात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी विविध फेक उपाय सांगणाऱ्यांचे पेव फुटले होते. त्यातूनच केंद्रीय मंत्री आठवलेंनी 'गो कोरोना गो'ला जन्म दिला होता. आता मेघवाल यांनी भाभीजी पापड बाजारात लाँच केले आहेत. यामुळे सोशल मीडियावर या लाँचिंगची चांगलीच टर उडवली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य युथ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मेघवाल यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ शेअर करुन आता आपल्याला देवच वाचवू शकतो असे कॅप्शन देऊन भाजपला टोला लगावला.
Post a Comment