..म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच नागरिकांवर अनेक निर्बंध आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले होते. कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉकडाऊन उठवणार नसल्याचं त्यांनी कालच स्पष्ट केलं होतं. आता यावर मनसेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कुणाला मंत्रालयात जाण्याचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे म्हणून राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप कमी वेळा मंत्रालयात गेले. आता ते मंत्रालयात जात नसल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. त्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. आता मनसेनेही यावरुन त्यांना लक्ष्य केले आहे. संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉक डाउन काढता येणार नाही... या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी 100% सहमत आहोत. पण कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून वाढवता ही येणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच यापुढे महाराष्ट्राची जनता असे नावंही त्यांनी टाकले आहे.
राज्यभरातील अनेक भागात लॉकडाऊन आहे. तसेच कोरोना रुग्ण जास्त असणाऱ्या ठिकाणी नागरिकांवर अनेक निर्बंध आहे. यामुळे विरोधक सातत्याने लॉकाडाऊन उठवण्याची मागणी करत आहेत. या सर्वांवर बोलतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत भाष्य केले होते. 'लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे. परंतु लोकांचा कंटाळा घावण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हेदेखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाउन उठवला आणि अचनाक साथ वाढली, त्यात लोकांचे जीव गेले तर पोटापाण्याच्या प्रश्नाचं काय करणार?' असं ते मुलाखतीत म्हणाले होते. तसेच लोकांचे जीव गेले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार असंही ते म्हणाले होते. यावरुनच आता मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Post a Comment