मुंबई - 'कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेनं देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. हे विरोधकांच्या पोटदुखीचं कारण असू शकतं आणि ते करोनाचंही लक्षण असू शकतं,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेली ही पहिली प्रदीर्घ मुलाखत आहे. विरोधकांकडून सरकारवर होणाऱ्या आरोपांना, घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून चोख उत्तरं दिली आहेत.
करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते सरकारवर सातत्यानं टीका करत आहेत. मुख्यमंत्री घरातून राज्यकारभार करत असल्याबद्दलही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अलीकडेच फडणवीस यांनी दिल्लीत असताना महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली होती. यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. 'फडणवीस दिल्लीला जाऊन तिथल्या परिस्थितीबाबत काही बोलले नाहीत. कदाचित त्यांनी स्वत:चा आमदार निधी दिल्लीत दिल्यामुळं ते दिल्लीत जाऊन महाराष्ट्राबद्दल बोलत असावेत,' असा चिमटा उद्धव यांनी काढला.
'काही दिवसांपूर्वी मी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतही मी सर्व सूचनांचं स्वागत केलं होतं. एखाद्या कोविड सेंटरमध्ये दुरवस्था असेलही, हे मान्य आहे. आपण त्यात सुधारणा करू शकतो. काही उणीव असेल तर ती दूर केलीच पाहिजे. लवकरच सर्वपक्षीयांची आणखीही एक बैठक घेणार आहे,' असं त्यांनी सांगितलं.
'मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. विरोधक बोलत राहतील. कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याची ती पोटदुखी असेल. किंवा ते करोनाचंही लक्षण असेल. पोटात दुखणं, तोंडाची चव जाणं अशी करोनाची वेगवेगळी लक्षणं आहेत. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळं अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं असू शकतं. आपल्यात एखादा अनपेक्षित बदल झाला असेल तर ते करोनाचं लक्षण असू शकतं,' असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना हाणला.
Post a Comment