शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकांवर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू करायच्या याबाबत सरकारमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकांवर सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत पालकांकडून मते मागवण्यात यावीत, असे पत्र राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे.
राज्यभरात सर्व माध्यमांच्या तसेच बोर्डांच्या ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबरमध्ये शाळा सुरु करणे तुम्हाला योग्य वाटते? अशी विचारणाही यात करण्यात आली आहे.
राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 17 जुलै रोजी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 20 तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा. मंत्रालयाकडून दोन प्रश्नांवर पालकांचे मत मागवण्यात आले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे पालकांना अनुकूल वाटते? शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या काय अपेक्षा असणार आहेत? असे हे दोन प्रश्न आहेत.
एकीकडे अधिकार्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नाही असे काही मुख्याध्यापकांनी सांगितले.
Post a Comment