वाढदिवस सीएम उद्धव ठाकरेंचा; चर्चा अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छांची आणि टायमिंगची!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याच्या राजकारणात अचुकता आणि टायमिंग साधण्यात पवार कुटुंबीयांचा कोणीही हात धरू शकत नाही असे उपहासाने म्हटले जाते. त्यामुळेच की काय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक शब्दाचा आणि तत्कालीन संदर्भाचा प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ राजकीय धुरंदरांकडून काढला जातो.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत सर्वांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. तथापि या सगळ्यांमध्ये हटके शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राहिल्या. त्यांनी मध्यरात्री चर्चेला वाव मिळेल असा फोटो ट्विटरला शेअर केला. त्या फोटोला कॅप्शन देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. असे म्हटले.
मात्र फोटो त्यांनी आपल्या हाती स्टेअरिंग असलेला आणि उद्धव ठाकरे बाजूला बसल्याचा शेअर केला. त्यामुळे त्यांचे टायमिंग आणि फोटो पाहून मध्यरात्रीपासूनच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. तो फोटो बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनामधील आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारचे स्टेअरींग अजितदादांच्या हाती असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी तीनचाकी रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हाती असल्याचे म्हटले होते.या फोटोची चर्चा सुरु असतानाच सायंकाळी अजित पवार यांनी थेट मातोश्री गाठून मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले. या भेटीनंतरही त्यांनी ट्विट करून माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वांद्रे येथील मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले. असे ट्विट केले.
Post a Comment