नवी दिल्ली - हिमालयातील चीन सीमेवर अतिरिक्त 35 हजार जवानांना तैनात करण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे उभय देशांतील तणावाची परिस्थिती निवळण्याची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, लडाख सीमेवरून भारतीय सैनिकांनी माघार घेतली असल्याचा चीनचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. सैन्य माघारीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांचे वरिष्ठ कमांडर लवकरच चर्चा करून सैन्य माघारीचे टप्पे ठरवतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. सैन्य माघारीच्या बाबतीत चीन आमच्यासोबत प्रामाणिकपणे काम करेल अशी अपेक्षा आहे, असेही मंत्रालयाने नमूद केले आहे.
गेल्या 15 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) गलवान खोर्यातील रक्तरंजित धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्य उभे ठाकले आहेत. सामंजस्याची तयारी दाखविण्याचा देखावा करीत चीनने वेळोवेळी दगाबाजी करीत भारतीय गलवान खोर्यात घुसखोरी केली आहे. तर दुसरीकडे ‘एलओसी’जवळ सैन्याची जमवाजमव करण्यास पाकिस्तानलाही चीनने उद्युक्त केले आहे. त्यामुळे विश्वासघातकी चीनला धडा शिकवायचा या निर्धाराने भारताने आणखी 35 हजार सैनिक तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे. 15 जूननंतर भारताने 40 हजार सैनिक ‘एलएसी’जवळ तैनात केले होते. सैन्य माघारीच्या चर्चेनंतर उभय देशांनी काही सैन्य मागे घेण्याचा समझोता केला होता. तथापि, चीन समझोत्यानुसार कधीच वागत नसल्याचा वाईट अनुभव आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन हजार किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेवर चीनची आगळीक रोखण्यासाठी भारतीय लष्कर आणि वायुसेनाही सज्ज झाली आहे.
सीमेवरील या घडामोडींमुळे लडाखमधील नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कायमची बदलली आहे, असे दिल्लीतील युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचे सदस्य, निवृत्त मेजर जनरल बी. के. शर्मा यांनी सांगितले. दोन्ही देशांनी सीमेवर सैन्याची जी जमवाजमव केली आहे, ती जोपर्यंत उच्चस्तरीय राजकीय तोडगा निघत नाही तोपर्यंत कायम राहील, असे दिसते.
कमांडरस्तरावरील पाचव्या फेरीच्या चर्चेची तयारी
पाकिस्तानसोबतच्या 742 किलोमीटर लांबीच्या सीमेवरही निगराणी ठेवणे आवश्यक असल्यामुळे पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराचे जवान तैनात ठेवण्याची तयारी केली जात आहे. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन म्हणाले, सध्या दोन्ही देश कमांडर पातळीवरील चर्चेच्या पाचव्या फेरीची तयारी करीत आहेत. सीमेवर शांतता राखण्यासाठी भारत, चीनला सहकार्य करेल, अशी आशा आहे.
Post a Comment