अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी होणार्या श्री राम जन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमात आता 600 लोकांची उपस्थिती असणार आहे. यात विशेषत्वाने धर्माचार्यांची संख्या अधिक असणार आहे. सुरुवातीला केवळ 200 लोकांना कार्यक्रमात सहभागी केले जाणार होते; पण धर्माचार्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही संख्या 600 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
साधू-संत, धर्माचार्य आणि मठ-मंदिरांच्या महतांना कार्यक्रमात उपस्थित राहता यावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. 600 लोकांना सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्यासाठी दोन मांडव बनविले जाणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीने धर्माचार्यांच्या समाधानासाठी कोरोना प्रोटोकोल लक्षात घेऊन ही कार्यवाही केली आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ज्या 200 लोकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यात विश्व हिंदू परिषद, राम मंदिराशी संबंधित साधू-संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रमुख मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख पन्नास लोकांना निमंत्रित केले गेले होते. यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, राजीव बजाज, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे. स्थानिक धर्माचार्य आणि साधू-संतांना या कार्यक्रमात प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यामध्ये अयोध्येतील प्रधानपीठ दशरथ महालचे बिंदुगद्याचार्य, राममंदिर आंदोलनाचे प्रमुख संत आणि खटल्याचे प्रतिवादी महंत रामचंद्र परमहंस यांचे उत्तराधिकारी दिगंबर आखाड्याचे श्रीमंहत सुरेश दास, राममंदिर आंदोलनातील प्रमुख सुग्रीव किलाचे महंत प्रसन्नाचार्य, अशर्फी भवनचे सिया किशोरी शरण, छोटी छावणीच्या श्रीमहंतांचे उत्तराधिकारी कमल नयन दास, कौशलेश सदनाचे विद्याभास्कर, बडा भक्तमालचे श्रीमहंत अवधेश दास, स्थानिक खासदार लल्लू सिंह, माजी खासदार आणि आंदोलनातील फायरब्रँड नेते विनय कटियार आदींच्या नावांचा समावेश होता.
Post a Comment