उद्धव ठाकरे यांनी आता राज्यात फिरावे



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता बाहेर पडून राज्यभर दौरे करण्याची गरज आहे, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडील खाती पाहता त्यांची मंत्रालयात अधिक गरज असल्याचेही पवार यांनी सुनावले आहे. आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही मंत्री अस्वस्थ असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार म्हणाले, की सुरूवातीचे दोन महिने उद्धव ठाकरे यांनी एका जागी राहून उत्तम परिस्थिती हाताळली, मात्र आता त्यांनी मराठवाडा, विदर्भात जाऊन लोकांना भीतीच्या वातावरणात धीर दिला पाहिजे. कोरोनाबरोबर आता जगायचे असल्याने लोकांच्या मनातली भीती जावी, यासाठीच आपण राज्यात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.


 
या तीनचाकांच्या गाडीचा रिमोट वा चार्जर माझ्या हातात नाही, हे सरकार आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे ही प्रयोग करण्याची संधी असल्याचे जाणवल्यानेच आम्ही सर्व चाचपणी केली आणि नेतृत्व शिवसेनेकडे जावे यावर एकमत झाले, असे पवार म्हणाले. आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये अस्वस्थता आहे का? या प्रश्‍नावर कुठल्याही आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असतेच असे सांगताना राज्य चालवताना सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही, त्यामुळे काही जण अस्वस्थ असतात, असे उत्तर पवार यांनी दिले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत एका ठिकाणी बसून चांगल्या प्रकारे परिस्थिती सांभाळली, पण आता त्यांनी बाहेर पडून फिरले पाहिजे. आम्ही लोकांच्यामध्ये आहोत, कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीच्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली, असे पवार म्हणाले. अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांच्याकडे फिल्डची जबाबदारी देण्यात आली असून अजित पवार विधीमंडळ पक्षाचे तर जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले. 

भूमीपूजनाला जाणार नाही; कोरोनाला प्राधान्य 

राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर वाद मिटला असला, तरी कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर असून त्यास प्राधान्य द्यायचे असल्याने आपण निमंत्रण आले तरी भूमीपूजनाला जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जावे की नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे,असे पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फायनान्स आणि प्लॅनिंग या खात्याची जबाबदारी आहे. या खात्याचे काम बाहेर फिरून करण्याचे नाही, त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे, असा सल्लाही शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post