परिस्थिती भयावह; IMA चा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - जगभर थैमान घालत असलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाख ७७ हजार इतकी झाली आहे. देशातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली असून परिस्थिती भयावह असल्याचा इशारा ‘आयएमए’ म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
‘आयएमए’ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.के मोंगा म्हणाले की, दररोज वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. देशात दिवसाला ३० हजार पेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची वाढ होत असून देशासाठी हालाकीची आणि खराब परिस्थिती आहे. शहरापर्यंत मर्यादित असणारा करोना विषाणू आता ग्रामिण भागातही वेगानं पसरत आहे. हे एक खराब संकेत असून असे वाटतेय की देशात समूह संसर्गाला सुरूवात झाली आहे.
करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. चार टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडं करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवारी (१९ जुलै, २०२०) सकाळपर्यंत भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाख ७७ हजार ६१८ इतकी झाली आहे. यामध्ये २६ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी करोनावर मात केलेली आहे. तर सद्यस्थितीस देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत.
भारतातील वाढत्या रुग्णसंख्येवर ‘आयएमए’ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.के मोंगा म्हणाले की, ‘गाव-खेड्यात संसर्ग झाला असून तेथील रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. अशीच संख्या वाढत राहिल्यास तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं कठीण जाऊ शकतं.’ ते म्हणाले की, ‘ दिल्लीमध्ये संसर्ग रोखण्यास आपण सक्षम होतो. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशबद्दल काय बोलणार. या राज्यातील हॉटस्पॉट संख्या आणखी वाढू शकते. ‘
Post a Comment