कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा



माय अहमदनगर वेब टीम
पुणे - राज्याचा काही भाग वगळता पावसाने दडी मारली आहे. परंतु पावसासाठी पुन्हा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 15 ते 17 जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता कमी झाल्याने पावसाचा जोरही कमी झाला होता. कोकणात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असला, तरी मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र, कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढत असल्याने पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागांत काही ठिकाणी पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत पाऊस हजेरी लावणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 14 जुलैला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दिवशी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.

15 जुलैला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. 16 आणि 17 जुलैला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी असेल. या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post