हताश बिग बींना मनोज कुमारांमुळे मिळाली होती मोठी संधी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - हिंदी चित्रपटाचे दिग्गज अभिनेते मनोज कुमार ८२ वर्षांचे झाले. २४ जुलै, १९३७ रोजी अबोटाबाद (आताचे पाकिस्तान) मध्ये जन्मलेले मनोज कुमार यांनी आपल्या सौम्य आणि दमदार अभिनय शैलीने एक नवी ओळख बनवली. मनोज कुमार यांचा २४ जुलैला वाढदिवस. अनेक शानदार देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. वाढदिवसाच्या खास औचित्याने मनोज कुमार यांच्या आयुष्याविषयी आणि चित्रपटाच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. शाळेत शिकत असताना एक दिवस मनोज 'शबनम' हा चित्रपट पाहायला गेले. दिलीप कुमार यांचा अभिनय त्यांनी पाहिला आणि त्यांच्या भूमिकेवरून आपले नाव मनोज कुमार असे ठेवले.

फाळणीनंतर भारतात आले

मनोज कुमार यांचे कुटुंबीय भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान सोडून दिल्ली आले होते. त्यावेळी मनोज कुमार १० वर्षांचे होते. त्यांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये राहू लागले. त्यांनी दिल्लीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.

'फॅशन'मधून बॉलिवूडमध्ये पाऊल

मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘फॅशन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘फॅशन’मध्ये त्यांनी एका भिकाऱ्याची खूप छोटीशी भूमिका साकारली होती. त्यांचा हा आवडता चित्रपट असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘कांच की गुडिया’ (१९६०) मध्ये मनोज कुमार यांनी पहिली मुख्य भूमिका साकारली होती. १९६० च्या दशकात रोमँटिक चित्रपट 'हरियाली और रास्ता’, ‘दो बदन’ के अलावा ‘हनीमून’, ‘अपना बना के देखो’, ‘नकली नवाब’, ‘पत्थर के सनम’, ‘साजन’, ‘सावन की घटा’ तर सामाजिक चित्रपट - ‘अपने हुए पराये’, ‘पहचान’ ‘आदमी’, ‘शादी’, ‘गृहस्थी’ और ‘गुमनाम’, ‘वो कौन थी?’ यासारखे एकापेक्षा एक चित्रपट केले.

देशप्रेमाची जागृती

मनोज कुमार यांनी देश प्रेम जागृतीपर चित्रपट बनवले. 'शहीद', 'उपकार', पूरब और पश्चिम' 'क्रांति' असे चित्रपट केले. चित्रपटातील अमूल्य योगदानासाठी मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके, पद्मश्री, फिल्मफेअर लाईफ टाईम अचीव्हमेंट यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हताश झालेल्या अमिताभ बच्चन यांना दिली होती संधी

अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव भारत होते. त्यामुळे अनेक फॅन्स त्यांना 'भारत कुमार'देखील म्हणायचे. मनोज कुमार यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सतत येणाऱ्या अपयशामुळे हताश होऊन अमिताभ बच्चन मुंबई सोडणार होते आणि आपल्या आई-वडिलांकडे दिल्ली परत जात होते, तेव्हा त्यांनी अमिताभ यांना थांबवले. आणि आपला चित्रपट 'रोटी, कपडा और मकान'मध्ये संधी दिली.

मनोज कुमार म्हणाले होते, "लोक अमिताभ यांच्यावर टिका करायचे. तेव्हा मला अमिताभ यांच्यावर पूर्ण विश्वास होता की, एक दिवस ते मोठे स्टार बनतील." मनोज कुमार यांनी 'रोटी, कपडा और मकान' चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते.



मनोज कुमार पुढे म्हणाले होते की, त्यांचा चित्रपट 'पूरब और पश्चिम'मध्ये काम करण्यासाठी दिलीप कुमार यांनी त्यांची पत्नी सायरा बानो यांची मनधरणी केली होती. त्यानंतर मनोज कुमार यांनी दिलीप कुमार यांना चित्रपट 'क्रांती'मध्ये कास्ट केलं होतं.

मनोज कुमार यांनी म्हटले होते की, या चित्रपटाची प्रेरणा त्यांना तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्याकडून मिळाली. शास्त्रींनी 'जय जवान-जय किसान'ची घोषणा दिली होती. असे म्हटले जाते की, मनोज कुमार यांचे तमाम नेत्यांशी चांगले संबंध होते. लाल बहादुर शास्त्री यांच्याशिवाय इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनादेखील मनोज कुमार यांचे चित्रपट पाहणे आवडायचे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post