न्यू जर्सीत होणार पहिला मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कसदार आशयघन कथाआशय, उत्तम हाताळणी आणि कसदार अभिनय यासाठी ओळखल्या जात असलेल्या मराठी चित्रपटाचा राज्य आणि देशाबाहेरचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१ चे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना MIFF च्या संचालिका नीता पेडणेकर म्हणाल्या की, मराठी संस्कृती, कला, मूल्ये, परंपरा, संगीत यांचे अमेरिकेत जतन करणे हा या मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू आहे. नेटफ्लिक्स आणि अॲमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचेही या महोत्सवासाठी सहकार्य लाभणार आहे.
या महोत्सवाच्या निवड समितीत कला दिग्दर्शक नीतिन चंद्रकांत देसाई आणि 'बकेट लिस्ट ' या चित्रपटाचे निर्माते अशोक सुभेदार यांचा समावेश आहे. तर हेमंत पांड्या कार्यकारी संचालक आहेत. मराठीत गेल्या काही वर्षांपासून काही वेगळे आणि दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. त्यासाठी श्वास, सैराट, किला, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग, फॅन्ड्री, देऊळ, नटसम्राट, काकस्पर्ष, कट्यार काळजात घुसली, नाळ या चित्रपटांचा खास उल्लेख करायला हवा. श्वास आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांची तर भारताची ऑस्करसाठीची विदेशी चित्रपट विभागात अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली.
वाचा -
दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) या चित्रपटाव्दारे निर्मिती सुरु केली आणि मग काळाबरोबर बदलत जात जात मराठी चित्रपटाने चौफेर प्रगती केली आणि प्रतिष्ठा प्राप्त केली. अलिकडच्या काळात मराठीत नागराज मंजुळे (सैराट), चैतन्य ताह्मणे (कोर्ट), अविनाश अरुण (किला) अशा नवीन दृष्टीचे दिग्दर्शक आले. न्यू जर्सी मराठी चित्रपट महोत्सवात मोफत प्रवेश घेता येईल असे या महोत्सवाची संचालिका नीता पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Post a Comment