मुंबई - राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नाही. सहा महिन्यांतच कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील नाराजी ठाकरे सरकारसाठी आता दररोजची डोकेदुखी ठरू लागली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार उपस्थित होते.
महाआघाडी सरकार असताना काँगे्रसला निर्णय घेता येत नाही असा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला होता. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक घेऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.
आता पुन्हा एकदा काँग्रेस आमदाराने आमचा मान राखला जात नाही. शिवाय काँग्रेस आमदारांची कामे रखडली जात असल्याची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने केलेल्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि सेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. तसेच मान राखला जात नसल्याची तक्रार धोटे यांनी केली आहे. तसेच कामे होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
तसेच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. याबाबत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत, अशी विनंती यावेळी धोटे यांनी केली असल्याची माहिती समजते
Post a Comment